आम्हाला मिळणारा राजा कसा असावा यासाठी नित्यपूजेत प्राचीन काळात एक मंत्र म्हटला जात असे.
स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां |
न्याय्येन मार्गेण महीं महीशाः ||
गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं |
लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु ||
अर्थ –
जो राजा या पृथ्वीवर ( आमच्या देशावर ) राज्य करतो आहे तो न्यायाने राज्य करणारा असू दे. त्याच्या राजवटीत सर्व प्रजाजन सुखी आणि आनंदी असू दे. त्याच्या राजवटीत ब्राह्मण / विद्वान लोक आणि गाई व निरपराध जीव सुखाने आनंदाने जगू दे. त्याच्या राजवटीत आम्हा सर्वांच्या जीवनाला आनंदाची सुखाची झालर असू दे.
अत्यंत साधा सोपा आणि सरळ मंत्र. राजाच्या कडून प्रजेची नक्की काय अपेक्षा असते ते अत्यंत मोजक्या शब्दात मांडणारा.
हा श्लोक प्रत्येक राज्यकर्त्याने आत्मसात करून स्वतःच्या खुर्चीवर बसताना स्वतःला आवर्जून प्रश्न विचारावा कि माझ्या राजवटीत मी सामान्य जनांना या श्लोकाच्या अनुसार जीवन देतो आहे का ?
आज लोकशाही आहे. प्रत्येक राज्यकर्त्याने, त्याच्या पक्षाने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी या कसोटीवर आपल्या नेत्याचे / आपल्या सरकारचे / आपल्या आवडत्या राजकीय पक्षाचे कार्य अभ्यासून त्याचे मूल्यमापन करावे…
खरोखरच प्रत्येक सामान्य नागरिकाने या मंत्राचे नित्य पठण सुरू केले आणि सर्व पक्ष कार्यकर्त्यांना आमची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून , देशाच्या पंतप्रधांनाकडून ही ठाम अपेक्षा आहे हे उच्चरवाने सांगितले तर जातीपातीची गणिते आपोआप बंद पडतील, खैराती योजनांची गरज पडणार नाही आणि धर्म आणि जात याच्या आधारावरील मतदान आपोआप बंद पडून आपल्याला खरोखर गुणवान आणि प्रजाहितदक्ष राज्यकर्ते लाभतील…
शुभम भवतु

