जाणता राजा
निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥
परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥
आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठायी ॥
नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ॥
धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
तीर्थेक्षेत्रे मोडिली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥
देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥
उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक ।
धूर्त तार्किक सभानायक । तुमच्या ठायी ॥
या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हां कारणे ॥
आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक राहती ।
धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वीं विस्तारिली ॥
कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांसी धाक सुटले ।
कित्येकांस आश्रय जाले । शिवकल्याण राजा ॥
तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
ऋणानुबंधे विस्मरण जाले । काय नेणो ॥
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हाप्रती ।
धर्मसंस्थापनेची कीर्ती । सांभाळिली पाहिजे ॥
उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागले ।
प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे ॥
समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले हे पत्ररूप काव्य आहे.
हे काव्य समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांच्या कर्तृत्वामुळे किती प्रभावित होते आणि त्यांच्या मनात शिवरायांच्या बद्दल किती अफाट स्नेह होता याचेच निदर्शक आहे. तुमच्या देशी वास्तव्य करून भेटीला येऊ शकलो नाही याची क्षमा सुद्धा मागितली आहे याचाच अर्थ या पूर्वी अश्या भेटी गाठी घडत होत्याच.
शिवरायांच्या मृत्यू नंतर शंभू राजांना सत्ता प्राप्तीसाठी अष्टप्रधान मंडळाची बंडाळी मोडून काढून सत्ता मिळवावी लागली होती. शंभू राजांनी सत्ता मिळवली त्यानंतर त्यांना आशीर्वाद आणि मार्गदर्शन करणारे समर्थ रामदास स्वामी यांचे हे पत्र रुपी काव्य आहे. हे काव्यच शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांचे नाते किती दृढ होते हे दर्शवणारे आहे. दुसऱ्या ओळीत सत्ताप्राप्तीसाठी कराव्या लागलेल्या आपल्याच लोकांच्या संहाराचा उल्लेख आहे.. आणि तिसऱ्या ओळीत आता उर्वरित मंडळीना एकत्र करून राज्यकारभार करा हा सुद्धा सल्ला आहे.. अर्थात अष्टप्रधान मंडळींच्या उचापती समर्थांना सुद्धा अयोग्यच वाटत होत्या हे यातून सिद्ध होते.
हे पत्र ब्रिगेडछाप मंडळींचे तोंड कायमचे बंद करण्यास पुरेसे आहे…
अखंड सावधान असावें । दुश्चित्त कदापि नसावें। तजविजा करीत बसावें । एकांत स्थळी ॥ १॥
कांहीं उग्र स्थिति सांडावी । कांहीं सौम्यता धरावी। चिंता लागावी परावी । अंतर्यामीं ॥ २॥
मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे। सुखी करूनि सोडावे । कामाकडे ॥ ३॥
पाटवणी तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना। तैसें सज्जनांच्या मना । कळलें पाहिजे ॥ ४॥
जनाचा प्रवाह चालिला । म्हणजे कार्यभाग आटोपला। जन ठायीं ठायीं तुंबला । म्हणजे खोटां ॥ ५॥
श्रेष्ठीं जें जें मिळविलें । त्यासाठीं भांडत बसलें। मग जाणावें फावलें । गलिमांसी ॥ ६ ॥
ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिसर्यासी जय। धीर धरोण महत्कार्य । समजून करावें ॥ ७ ॥
आधींच पडला धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती। याकारणें समस्तीं । बुद्धि शोधावी ॥ ८ ॥
राजी राखितां जग । मग कार्यभागाची लगबग। ऐसें जाणोनियां सांग । समाधान राखावें ॥ ९ ॥
आधीं गाजवावे तडाके । मग भूमंडळ धाके। ऐसें न होतां धक्के । राज्यास होती ॥ १० ॥
समय प्रसंग ओळखावा । राग निपटून काढावा। आला तरी कळों न द्यावा । जनांमध्यें ॥ ११ ॥
राज्यामध्ये सकळ लोक । सलगी देऊन करावे सेवक। लोकांचे मनामध्यें धाक । उपजोंचि नये ॥ १२ ॥
आहे तितुकें जतन करावें । पुढें आणिक मिळवावें। माहाराष्ट्रराज्य करावें । जिकडे तिकडे ॥ १३ ॥
लोकीं हिंमत धरावी । शर्तीची तरवार करावी। चढती वाढती पदवी । पावाल येणें ॥ १४ ॥
शिवराजास आठवावें । जीवित्व तृणवत् मानावें। इहपरलोकी रहावें। कीतीर्रूपे ॥१५॥
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥ शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥
शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥ शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥१७॥
सकळ सुखांचा त्याग । करून साधिजे तो योग ॥ राज्यसाधनाची लगबग । कैसी असे ॥१८॥
त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥ या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥
पत्राच्या शेवटी वडिलांच्या कर्तुत्वापेक्षा अधिक काही विशेष करून दाखवलेत तरच लोक तुम्हाला मानतील असे त्यांच्या पौरुषाला आवाहन सुद्धा केले आहे…
वरील दोन काव्य रुपी पत्रे हा शिव समर्थ संबंधाचा बिनतोड पुरावा आहे.. माझ्या मते या पेक्षा अधिक पुराव्याची काहीही गरज नाही…
© सुजीत भोगले


प्रतिक्रिया व्यक्त करा