भाग 1
|| ॐ कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी धीमही तन्नो दुर्गे प्रचोदयात ||
जी चैतन्याचे मूर्तरूप आहे, जियेच्या इच्छामात्रेने या विश्वाची निर्मिती झाली आहे त्या ज्ञानस्वरूप, मनोज्ञा श्री ललिता महात्रिपुरसुंदरीच्या चरणी साष्टांग दंडवत घालून एका अत्यंत गंभीर विषयावर लेखन सुरु करतो आहे. तूच शारदा आहेस तूच गणेशाची माता आहेस या भाष्याला निर्दोष लिहिण्याचे सामर्थ्य दे.
ब्रह्मानंदम परमसुखदं केवलं ज्ञानमुर्तिम |
द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादी लक्ष्यम ||
एकं नित्यं विमलं अचलं सर्व धिः साक्षीभूतम |
भावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरू त्वं नमामि ||
बुद्धिदाता ॐकार गणेशाच्या आणि आदि शंकराचार्यांच्या चरणी वंदन करून प्रस्तुत विषयावरील लेखनाला प्रारंभ करतो आहे.
श्रीकृष्णाची शिष्टाई विफल झाल्याच्या नंतर महाभारताचे युद्ध अपरिहार्य होते. या युद्धात प्रचंड नरसंहार होणार होता. आपल्या आप्तेष्टांचा आणि स्वजनांचा या युद्धात मृत्यू होणे आणि त्यातून शोक निर्माण होणे हे अटळ याची जाणीव झाल्याने धृतराष्ट्र राजा अत्यंत व्यथित झाला होता. शोकाचे निरसन केवळ ज्ञानातून होऊ शकते हे त्याला माहिती होते, म्हणून त्याने विदुराला मला ज्ञानोपदेश कर असा आदेश दिला.
विदुराला या शोकाच्या निरसनासाठी कोणते ज्ञान धृतराष्ट्राला देणे आवश्यक आहे हे ज्ञात होते. तो राजाला म्हणाला “ हे राजन या महायुद्धात स्वजन आणि आप्तांचा मृत्यू होईल या कल्पनेने तू शोकमग्न होतो आहेस, परंतु मृत्यू अशी काही वस्तूच नाही ते केवळ मोहाचे फळ आहे.”
धृतराष्ट्र हे ऐकून थक्क झाला. “ मृत्यू नाही असे तू कसे काय म्हणतो आहेस ? मला हे विस्तृत समजावून सांग.” यावर विदुर उत्तरला. “ मृत्यू नाही हे ज्ञान मला सनतकुमार यांच्या कडून प्राप्त झाले आहे.
मला हे ज्ञान आहे, परंतु मी द्विज नाही. त्यामुळे या ज्ञानाचे उच्चारण करण्याचा मला अधिकार नाही. मी माझे गुरु सनतकुमार यांना आवाहन करतो. ते इथे योगबलाने प्रकट होऊन हे राजा तुझ्या सर्व शंकांचे आणि शोकाचे निरसन करतील.”
या नंतर धृतराष्ट्र राजा आणि सनतकुमार यांच्यात एकांतात चर्चा झाली. तेच सनतसुजातीय अध्यात्मशास्त्र. यावर आदि शंकराचार्य यांनी भाष्य केलेले आहे. रामायण, महाभारत आपण सगळे जण कथा आणि ईश्वराच्या लीलांचे वर्णन म्हणून वाचतो, अभ्यासतो. त्या ग्रंथातील नैतिकतेचे नियम आणि सिद्धांत यावर चर्चा करतो परंतु या महाकाव्यातील जे तत्वज्ञान आहे ते दुर्लक्षित रहाते.
सनतसुजातीय अध्यात्मशास्त्र हे याच प्रकारे दुर्लक्षित राहिलेले तत्वज्ञान आहे.
इथे एक गोष्ट आपण समजून घेणे आवश्यक आहे.
आपल्या सनातन धर्माचा पाया म्हणजे वेद. वेद रचयिते ऋषी आणि तत्कालीन समाज अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत उन्नत होता. त्यांची जीवनशैली पूर्ण निसर्गानुरूप होती त्यामुळे वेदातील तत्वज्ञान शुद्ध स्वरुपात पचवणे तत्कालीन समाजाला सहज शक्य झाले.
कालांतराने समाजात भौतिकता वाढत गेली आणि अध्यात्मिक अवनती सुरु झाली मग सामान्य जनांना वेदांचे तत्वज्ञान शुद्ध स्वरुपात समजून घेणे कठीण होऊ लागले त्यावेळी या ज्ञानाला उपनिषदांच्या स्वरूपात शब्दबद्ध केले गेले.
ज्या वेळी औपनिषदिक ज्ञान समजून घेण्यास आपला समाज अपयशी होऊ लागला त्यावेळी हे ज्ञान पुराणांच्या रूपाने अधिक विस्तृत करून मांडले गेले.
सामान्य जनांना समजावा या साठी या ज्ञानाला अधिकाधिक विस्तृत आणि खुलासेवार पद्धतीने सांगण्याची वारंवार आवश्यकता निर्माण होत गेली आणि त्या अनुसार आपल्या प्राचीन ऋषींना या ज्ञानाला अधिकाधिक सुलभ करण्याची आवश्यकता निर्माण होत गेली.
यापुढील सुलभीकरण म्हणजे रामायण आणि महाभारत या महाकाव्यांची रचना.
तत्वज्ञानाच्या शुद्धतेची उतरंड आपण मांडत गेलो तर वेद प्रथम आणि सर्वोच्च स्थानी आहेत. त्याखाली उपनिषदे आहेत. तिसऱ्या पायरीवर पुराणे आहेत.
महाभारत आणि रामायण हे आपल्या संस्कृतीचे प्रतिक रूप ग्रंथ आणि इतिहास आहेत. या पुढील ऋषी आणि संतांच्या कार्याचा इथे उल्लेख करत नाही. परंतु कालौघात जशी जशी आवश्यकता निर्माण होत गेली त्यानुसार या विभूतींनी वेदातील ज्ञान सामान्य जनांना अधिकाधिक सोपे करून सांगितले आहे आणि समाजाचे नैतिक अधःपतन होऊ नाही याची काळजी घेतली आहे.
या लेखमालेमध्ये सनतसुजातीय यांचे अध्यात्मशास्त्र उलगडून सांगण्याचा प्रयास केला आहे. यात मूळ संहिता, आदि शंकराचार्य यांनी केलेले भाष्य आणि आधुनिक काळातील विद्वानांनी त्याचे केलेले विवेचन यांचा आधार घेतला आहे.
विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मूळ श्लोक अत्यंत नेमक्या आणि मोजक्या शब्दात आहेत. भाष्यकार आदि शंकराचार्यांनी सुद्धा अल्पशब्दात सांगितले आहे. आचार्यांच्या लेखनावर भाष्य करणाऱ्या विद्वानांनी सुद्धा विस्तृत लिहिण्याचा मोह टाळला आहे. अर्थात हे वाचणारा व्यक्ती विशिष्ट अध्यात्मिक पात्रता असलेला असेल हे गृहीतक आहे. परंतु हा विषय सध्याच्या परिस्थितीत सर्वांच्या पर्यंत पोचला पाहिजे असे मला आतून वाटत होते.
त्यामुळे सर्व विद्वत्जनांची क्षमा मागून मी मात्र शब्दविस्तार करणार आहे. जिथे शक्य असेल तिथे पुराणातील कथा आणि अन्य दृष्टांत देऊन विषय अधिक उलगडून सांगण्याचा प्रयास करणार आहे.
ब्रह्मवेत्त्याच्या पातळीवरील ज्ञानी असणारा विदुर मृत्युच्या स्वरूपाचे पूर्ण ज्ञान असूनही त्याचे विवेचन आणि प्रतिपादन करत नाही आणि धृतराष्ट्राला मी दासीपुत्र अर्थात जन्माने शुद्र असल्याने हे सांगत नाही असा स्पष्ट उल्लेख करतो. हा उल्लेख मी सुद्धा आवर्जून तसाच ठेवला आहे.
त्याचे कारण म्हणजे जे लोक बहुजनांच्या शोषणाची थेअरी मांडत असतात त्यात वेदविद्येपासून ज्ञानाच्या पासून वंचित ठेवले गेले ही हक्काची ओरड आहे. इथे विदुर शुद्र आहे तरी तो ब्रह्मज्ञान प्राप्त आहे. फक्त त्याचे प्रतिपादन तुझ्यापेक्षा उच्चवर्णीय व्यक्तीपुढे करू नकोस हे बंधन त्याला आहे.
लेखक – सुजीत भोगले


प्रतिक्रिया व्यक्त करा